माहितीपूर्ण लेख- दादा लाड कापूस तंत्रज्ञान – शेतकऱ्यांसाठी वरदान !🌱

दादा लाड कापूस तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान !��



कापूस हे एक भारतातील प्रमुख पीक आहे. कापूस हे शेतकऱ्याचे पांढरे सोने आहे. परंतु गेल्या काही वर्षात कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल थोडा कमी झाला आहे. कमी उत्पादन, रोगांचा प्रादुर्भाव ई. त्याची कारणे आहेत. २००२ मध्ये बी.टी. कापूस आला आणि शेतकरी भारावून गेला. बीज, फवारणी, रासायनिक खत यावर मोठा खर्च होतो. खर्च वजा जाता नाममात्र उत्पन्न राहते. त्यामुळे कापूस या पिकापासून शेतकरी दूर जात आहे. कापसाऐवजी पैशाचे पीक म्हणून सोयाबीनची निवड केले जात आहे. कापूस या पिकाकडे दुर्लक्ष हे आपल्या देशाला परवडणारे नाही. मराठवाड्यातील प्रमुख पीक असनाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे.

श्री. दादा लाड यांनी खूप साऱ्या प्रयोगानंतर शेवटी एकरी भरपूर उत्पादन कसे मिळवावे या वर यश मिळवलेच. सध्या त्यांचा हा प्रयोग देशभरात ‘दादा लाड कापूस तंत्रज्ञान’ या नावाने प्रसिद्धीस आला आहे. त्यांच्या प्रयोगाची दाखल केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी घेतली आहे. तसेच हे नवीन तंत्रज्ञान एक ‘शास्त्रीय शोध’ असल्याचे केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील शास्त्रज्ञ म्हणत आहेत. हे तंत्रज्ञान कापूस उत्पादन खात्रीशीर दोन पट मिळवून देईल.

कपाशीत झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात. १.गळफांदी (मोनोपोडीयम) आणि २.फळफांदी (सिमपोडीयम). गळफांद्या सुरुवातीलाच येतात आणि त्यांची संख्या २ ते ३ असू शकते. नंतर वर येणाऱ्या फळफांद्या. त्यांची संख्या झाडाच्या उंचीवर अवलंबून आहे. प्रत्येक झाडाला किमान १० ते १५ फळफांद्या असतात. झाडाच्या खोडाकडून आलेला अन्न द्रव्य पूर्णपणे फांदीवर असलेल्या बोंडाला देतात. या फांद्यांवरच्या बोंडांची संख्या आणि बोंडांचे वजन झाडाच्या खोडाकडून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून असते. गळफांदी झाडाच्या उंचीइतकीच उंची आणि खोडाची जाडीही तेवढीच. झाडांनी घेतलेल्या अन्नरसातला ७०% अन्नरस या दोन-तीन फांद्या घेतात. उरलेला ३०% अन्नरस झाडावर असलेल्या १२ ते १५ फळफांद्यांना मिळतो. हा अन्नरस अतिशय कमी; त्यामुळे फळफांद्यांची लांबी वाढत नाही. फांदीवर तीन ते चार बोंडं लागतात. त्यांना अन्नरस कमी मिळाल्यामुळे बोंडांचे वजन कमी भरते. कापूस पारंपारिक पद्धतीने लागवड न करता तो ९० से. मी. X ३० से. मी. ने लावावा. असे केल्यास एकरी १४५२० झाडे होतील.


काय आहे दादा लाड तंत्रज्ञान ?

हे एक सहज सोपे आणि शेतकऱ्याला समजणारे तंत्रज्ञान आहे.

पहिला टप्पा - ज्या मध्ये आपल्याला सेकेटर (कलम कैंची) या छोट्या झाडे कापणाऱ्या कात्री च्या सहाय्याने १ ते २ इंच खोडापासून अंतर सोडून ती फांदी (गळफांदी) काढून टाकायची आहे जेणेकरून अन्नाद्रव्याचा पुरवठा वरच्या फळफांदी ला गेला पाहिजे. एका फळफांदीवर ३,४ ऐवजी ८,९,१० बोंडं लागतात. साधारणपणे प्रत्येकी ५ ते ६ ग्रॅम वजनाची. बोंडांचे वजन वाढवले की कापसाचे उत्पादन वाढते. बोंडांचे वजन ३ ग्रॅमवरुन ६ ग्रॅमवर गेले असल्याचे दिसून आले.

दुसरा टप्पा - एका ठराविक उंचीनंतर खोडाचा आकार कमी होतो व बोंडाचे वजनही १ ते १.५ ग्रॅम होते. म्हणजे ही वाढ कामाची नाही. म्हणजे जिथून खोडाची जाडी कमी होते तिथेच झाडाची उंची रोखावी. त्या साठी बी लावल्याच्या ९० ते १०० दिवसात तो वर जाणारा शेंडा तोडून टाकावा किंवा वनस्पती वाढ नियामक – चमत्कार(मेपीकॉट क्लोराईड ५% ) फवारावे असे केल्यावर अकारण वर जाणारा अन्नरस फळफांद्यांना मिळतो.

सरासरी ६ ग्रॅम धरले तरी एकरी २० क्विंटल कापूस आरामात येतो. म्हणजे आजच्या येणाऱ्या कापसाच्या तीनपट कापूस जास्त.

 




Post a Comment

0 Comments