मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी बियाण्यांचा दिलासा

मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी बियाण्यांचा दिलासा

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाम फाउंडेशन व संस्कृति संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या वतीने, SLB प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्याने आज हसनाळ (ता. मुखेड) येथे रब्बी हंगामासाठी हरभरा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतीजमिनीचे, जनावरांचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, मारजवाडी, भासवाडी, भेंडेगाव आणि भाटापूर या गावांतील एकूण ७६५ पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. या बियाण्याचा उपयोग शेतकरी रब्बी हंगामात पेरणीसाठी करून खरीपातील नुकसानीची भरपाई करू शकतील. कार्यक्रमादरम्यान संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र, सगरोळीचे प्रा. कपिल इंगळे यांनी हरभरा, रब्बी ज्वारी व करडई या पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा योग्य उपयोग करून रब्बी पिकांचा विस्तार करण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या शंकांचे समाधान केले. श्री. वसंतराव रावणगावकर व हसनाळचे पोलीस पाटील श्री. आनंदराव इंगोले यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन झाले. #रब्बी_बियाणे_वाटप #शेतकरी_दिलासा #मुखेड #नामफाउंडेशन #SLBप्रायव्हेटलिमिटेड #संस्कृतिसंवर्धनमंडळ #पूरग्रस्तशेतकरी #NandedFloods #हरभरा #कृषिविज्ञानकेंद्र #kvksagroli

Post a Comment

0 Comments