शेतकऱ्यांनी सेंद्रिय व एकात्मिक शेतीचा अवलंब करावा. डॉ. इंद्र मणी सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवास सुरुवात; शेतकऱ्यांची गर्दी.
मातीतील सेंद्रिय घटक संपले आहे, परंतु यामध्ये बदल केल्यास पुन्हा आपली जमीन सदृढ बनवू शकतो यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच एकात्मिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन वनाम कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले. सगरोळी (ता.बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे बुधवार (ता.७) आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांसमोर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार, कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. प्रीतम भुतडा, कोल्हापूर येथील उद्योजक गणपत पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी पूरक उद्योगांची कास धरावी यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले प्रात्यक्षिक प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. येथील प्रत्येक कोपरा शिकण्यासारखा असून शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही असेही ते म्हणाले. विनोद रापतवार यांनी, शेती व्यवसायाकडे तरूणांना आकर्षित करण्यासाठी अमेरिकेतील फ्युचर अॅग्रीकल्चर लिडरशीप इनिशीएटीव्ह असे कार्यक्रम सुरू करण्याची वेळ आली आहे. सिल्क व मिल्क ह्याची जोड द्यावी. 'फास्ट फूड' प्रमाणेच 'स्लो फूड' या नावाखाली स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे असे म्हणाले. दिलीप दम्मय्यावार यांनी, नाबार्डच्या विविध योजना व सेंद्रिय शेतीवर आधारित जीवा प्रकल्पाबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्रमोद देशमुख यांनी, शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामुहिक शेती व तंत्रज्ञांचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
0 Comments