कापूस पिकांमध्ये सध्या होत असलेल्या पातेगळ ची कारणे आणि उपाय योजना

कापूस पिकांमध्ये सध्या होत असलेल्या पातेगळ ची कारणे आणि उपाय योजना...


कापूस हे भारतात लागवड केले जाणारे एक मुख्य पीक आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. महाराष्ट्र राज्यात या पिकाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील खानदेश भागात सर्वाधिक कापसाचे लागवड केली जाते. सध्या कापूस पीक पाते तसेच फुल धरण्याच्या अवस्थेत आहे तसेच काही ठिकाणी कपाशीमध्ये आता बोंडे विकसित होत आहे. मात्र, अशा परिस्थितीत हवामान बदलाचा तोटा कापूस पिकावर होऊ शकतो. राज्यात सध्या सतत पाऊस सुरू आहे ज्या ठिकाणी पाऊस सुरू आहे तिथे पातेगळ होत असून ज्या ठिकाणी हवामान कोरडे आहे मात्र सूर्यप्रकाश पुरेपूर झाला नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पातेगळ होत आहे. कपाशीला पाते असतील तरच कापूस उत्पादन हातात येते. 

परंतु जर पातेगळ मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्याचा परिणाम थेट हा कापूस उत्पादनावर होतो. 

कापूस पातेगळ कारणे: 

1. कापूस वाढीच्या पुरेपूर कालावधीनंतर जेव्हा बोंडे आणि पात्यांची संख्या झाडावर जास्त प्रमाणात झाली असेल तेव्हा दोन झाडांमध्ये जमिनीमध्ये उपलब्ध असलेला अन्नसाठा प्राप्त करण्यासाठी चढाओढ निर्माण होते त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा हवा तेवढा न झाल्यामुळे बहुतेक पाते आणि बोंडांची गळ मोठ्या प्रमाणात होते. 
2. तसेच हवामान बदल आणि किडींचा झालेला प्रादुर्भाव व कपाशीच्या झाडाच्या अंतर्गत क्रिया इत्यादी घटकांचा परिणाम. 
3. अन्नद्रव्यांचे झाडांमध्ये आवश्यक तेवढे वाहन न होणे.
4. उमलेल्या फुलावर पाऊस पडून पराग सिंचन आवश्यक त्या प्रमाणात न झाल्यामुळे. 


पातेगळ थांबवण्यासाठी उपाय योजना:

1. कपाशीची लागवड करताना जमीन ही निचरा होणारी निवडावी.
2. आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
3. कापूस पिकातील नैसर्गिक पातेगळ थांबवण्यासाठी नेप्थेलीन ऍसिटिक ऍसिड (NAA) 20 मिली/100 लिटर पाणी अशा प्रमाणात फवारणी करावी. 
4. कपाशी पिकाला पाते लागले असता व फुले लागण्याच्या कालावधीत दोन टक्के डीएपी 200 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी एक ते दोन फवारण्या घ्याव्या.
5. बोरॉनची फवारणी घ्यावी. 30 ग्रॅम/15 लिटर पाणी.

कपाशीमध्ये लाल्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट/100 लिटर पाणी प्रमाणात घेऊन पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा फुले लागण्याच्या आणि बोंडे लागण्याच्या अवस्थेत फवारणी करावी.

Post a Comment

0 Comments