सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर – डॉ. भेदे

सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर – डॉ. भेदे


विकसित कृषि संकल्प अभियानाचा अकरावा दिवस संपन्न

सगरोळी दिनांक 8 जुन– विकसित कृषि संकल्प अभियानाच्या अकराव्या दिवशी लोहा तालुक्यातील बामणी, जानापुरी, सोनखेड, टेळकी, दापशेड व शेळगाव येथे महत्त्वपूर्ण कृषी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात डॉ. भेदे यांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचे महत्त्व विषद केले. त्यांनी स्पष्ट केले की या तंत्रज्ञानामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते, तसेच उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमात कृषी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूरचे श्री. राहुल डमाळे, ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, कापूस संशोधन केंद्र, नांदेडचे डॉ. भेदे, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभुरे आणि श्री. बालाजी चंदापुरे हे तज्ज्ञ उपस्थित होते.
बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये साठवले जाते, ज्यामुळे मृदासंवर्धन आणि जलसंधारण होते. तसेच, अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पिकाचे नुकसान टाळता येते. या तंत्रज्ञानाचा उपयोग सोयाबीन, तूर, कपाशी, हळद आणि इतर पिकांसाठी केला जातो.
कार्यक्रमात शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाच्या वापराविषयी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून देशभरातील 1.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
चिकू, लिंबू आणि सीताफळ या पिकांचीही चर्चा या कार्यक्रमात करण्यात आली.
- चिकू: दमट हवामानासाठी उत्तम, गोडसर आणि पोषणमूल्यांनी समृद्ध.
- लिंबू: व्हिटॅमिन C ने भरपूर, विविध प्रकार उपलब्ध.
- सीताफळ: कोरडवाहू पीक, उत्तम निचरा असलेल्या जमिनीसाठी योग्य.
शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून उत्पादनवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व उपस्थित तज्ज्ञांनी केले.

Post a Comment

0 Comments