नांदेड जिल्ह्यातील करखेली येथे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न!
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर आणि संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मौजे करखेली येथे नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत करखेली येथील शेतकऱ्यांच्या शेतावर 60 एकर क्षेत्रावर दादा लाड कापूस तंत्रज्ञान पद्धतीनुसार कापूस लागवड करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान, डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकातील सद्यस्थिती आणि व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये गळ फांदी कापणे, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन तसेच रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) यावर विशेष भर देण्यात आला. त्यांनी पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे आणि निंबोळी अर्काचा वापर याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
प्रशिक्षण कार्यक्रमानंतर, काही शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या विशेष कापूस प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी श्री. प्रभुदास उडतेवार आणि श्री. बालाजी चंदापूरे यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान आणि कीड व्यवस्थापनाची माहिती मिळाल्याने कापसाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल अशी आशा आहे. #agriculture #cotton #शेतकरी #कापूस #दादा_लाड_कापूस_तंत्रज्ञान #farmers #farmer #farming
0 Comments